प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर

धनगर समाजाचे भीष्मपितामह भाई आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या शुभहस्ते "पुन्हा एक नवी दिशा" या पुस्तकाचे प्रकाशन यशवंत महोत्सव मध्ये करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवर माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, जहागीरदार अमरजितसिंह राजे बारगळ, मा.भुषणसिंह होळकर, प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर तसेच अन्य प्रमुख पाहुणे
प्रस्तावना (पुन्हा एक नवी दिशा)
        ✍️ प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर
             पुन्हा एक नवी दिशा देत असताना आमचे समविचारी मित्र श्री नितीनराजे अनुसे यांनी धनगर समाजाच्या वेद काळापासून ते आजच्या अवस्थेचे चिंतन केले आहे. खरंतर धनगर हा वेदात मुळ निवासी गणला जातो. ही माणसं जंगलात गाणी गायची ती गाणी येथील ऋषीमुनींनी जशीच्या तशीच वेदात लिहून ठेवली आहेत. अर्थातच वेद म्हणजे धनगरांची गाणी आहेत. वेदात वनस्पती, प्राणी, झाडे, झुडपे यांची नावे देणारा मुळ पुरुष आर्थातच मुळ निवासी हा धनगरच होता. त्या काळी ऋषीमुनी औषधांची माहिती, शोध धनगरांच्या मदतीनेच घेत असे. वनस्पतींची ओळख सांगणारा, जंगलाच्या सानिध्यात राहणारा सर्वप्रथम मुळ निवासी धनगरच असल्याचे वेदात सांगितले आहे.जर्मन शास्त्रज्ञ मैक्समूलर यांच्या मते "Vedas were the songs of Shepherds." (Shepherd म्हणजेच धनगर). जे पी बघेल यांच्या मते धनगरानीच वेदाचे संकलन केले आहे.
           पुन्हा एक नवी दिशा पुस्तकात लेखकांनी धनगरांच्या उत्पत्ति पासून ते या जमातीत जन्म घेतलेल्या श्री कृष्ण, पांडव पासून ते आद्यसम्राट धनगर पुत्र चंद्रगुप्त मौर्य, चक्रवर्ती सम्राट राजा अशोका, मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ असलेले पहिले थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर, शूरवीर राजे खंडेराव होळकर, राष्ट्रमाता कर्मयोगीणी अहिल्याई होळकर, एकमेकाद्वितीय योद्धा महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर, विरांगना भिमाई होळकर, क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब, माजी मंत्री स्व शिवाजीराव शेंडगे तसेच महाराष्ट्राचा ढाण्या वाघ स्व बापू बिरु वाटेगावकर असा धनगर पुत्रांचा अत्यंत वास्तववादी, प्रेरणादायक मांडला असून इतिहासाची सांगड घालून युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात संघटन करून संघर्ष करण्यासंदर्भात विचार मांडले आहेत.
          युवकांनो इतिहास घडविण्यासाठी अगोदर इतिहास समजून घ्यावा लागतो. वाचाल तर वाचाल आणि ज्ञान हे शास्त्र नसून शक्ती व शस्त्र आहे. जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांची पिढी संघटित होऊन उद्याच्या उज्वलतेसाठी ज्ञान प्राप्त करून, पुस्तके वाचून ज्ञानाची शिदोरी सोबत बाळगाल म्हणजे निश्चितच समाजाचा विकास होतो.
         धनगर समाजाच्या घरात देवघरांपेक्षा पुस्तकांचे देवघर असणे आता काळाची गरज आहे. कारण ज्यांच्याकडे पुस्तके असतात त्यांची मस्तके चांगली असतात आणि मस्तक असणारे कोणाचे हस्तक होत नाहीत. यासाठी तरुणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास समजून घेतला पाहिजे. शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच आपला आणि आपल्या समाजाचा उद्धार होणार आहे. बाईच्या नादी लागण्यापेक्षा आईसोबत रहा म्हणजे घरचे भले होईल.
          सदरच्या पुस्तकात "पुन्हा एक नवी दिशा " द्यायचा लेखकांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे. वर्तमान काळात समाजाने शिकले पाहिजे व प्रशासनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे. त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही. एकवेळ आमदार खासदार होणे अवघड आहे परंतू कलेक्टर, तहसीलदार, क्लास१, क्लास२ होणे सोपे आहे. त्यासाठी ज्ञानाची, अभ्यासाची, प्रयत्नांची कास धरावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
           धनगर जमातीचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. गेल्या ७० वर्षात प्रस्थापित राजकीय लोकांनी स्वताच्या सत्तला आरक्षणाचा धोका असल्याचे ओळखून धनगर समाजाला न्याय मिळू दिला नाही. जो अन्याय करतो त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे खरंतर अज्ञानपणाचे म्हणजेच मुर्खपणाचे लक्षण आहे. आरक्षणाचा गुंता हा राज्यघटनेच्या कलम ३४२ (२) प्रमाणेच सोडविता येऊ शकतो त्यासाठी धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी संसदेत जाणे अनिवार्य आहे. त्याशिवाय जमातीचे हित होणार नाही.'आपुलिया हिता जो जाणता, धन्य मातापिता तयाचिये' संत तुकाराम महाराजांच्या संदेशाप्रमाणे मस्तकावरती नव्हे तर मस्तकात विचारांची क्रांतीची गाथा घालावी लागेल.
          कुर्हाड जंगल तोडत होती पण झाडे मात्र कुर्हाडीलाच मतदान करत होती. कारण कुर्हाडीचा दांडा हा झाडांच्याच जातीचा आहे ना! तसंच आज राजकारणात जमातीचे पुढारी समाजाच्या प्रगतीचा विचार न करता आपापल्या राजकीय पक्षाच्या भल्याचा विचार करतात. हे सोडले पाहिजे असा संदेश लेखक "पुन्हा एक नवी दिशा" या पुस्तकात देऊन जातोय.
          या प्रसंगी मला इसापनितीतील एक कथा आठवतेय... एका राज्याचे सिंहासन रिकामे होते, त्याचा वारस नेमण्यासाठी दवंडी पिटवली जाते. जो कोणी सर्वप्रथम सिंहासनावर येऊन बसेल तो राजा असेल, स्पर्धा गाढव आणि कुत्र्यात सुरू झाली आणि गाढव सर्वप्रथम सिंहासनावर जाऊन बसले. कारण कुत्रा पळत असताना त्याच्याच भाऊबंदांनी त्याला अडवल्यामुळे तो सिंहासनावर सर्वप्रथम पोहचू शकला नाही. त्यावर कुत्रा निराश होऊन म्हणतो की माझ्याच भाऊबंदांनी मला पाय आडवे घालून अडवले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते. गेली ७० वर्षे हेच चालू आहे याचे चिंतन करण्याची वेळ आता आली आहे. कारण सामाजिक उत्कर्षासाठी राजकीय सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहे. या प्रसंगी मला विदर्भ पुत्र यशवंत यांची कविता आठवते.
            तुम्ही आमच्या साधेपणाचा
            वाटेल तसा फायदा घेतला
बघता बघता उंच होऊन
तुम्ही आकाशाला टेकला
            हळूहळू जड होत गेले
            आमच्या डोक्यावरचे तुमचे पाय...
तुमच्या मोठेपणाबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही.
            फक्त एवढेच सांगा की
            आता आमचे काय?
         गेली ७० वर्षे झाली लोकशाहीत अनेकांना मोठे केले आहे. परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.कारण तशी राजकीय इच्छाशक्ती नाही आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय नेत्यांची नियत बरोबर नाही.
          जो भयग्रस्त समाज आहे त्यांचा विकास खुंटतो मात्र जे झगडतात त्यांनाच यश मिळते. यापुढे धनगर समाजाचे भवितव्य हे राजकारणात आहे. मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाची आज मला प्रखरतेने आठवण होतेय...
"यापुढे भारतात पुढारलेले लोक व मागासवर्गीय यांचा लढा चालू राहील. आता कदाचित तुम्ही म्हणाल की  मागासलेला वर्ग बहुसंख्य असताना पुढारलेल्या लोकांपासून भिती बाळगण्याचे कारणच नाही. परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की एखादा समाज बहुजन/बहुसंख्येने आहे एवढ्यावरच भागणार नाही तर तो समाज जागृत, सुशिक्षित तसेच स्वाभिमानी असेल तर त्याचे सामर्थ्य वाढेल. नाहीतर गिरणीच्या मालकाने अथवा एखाद्या श्रीमंत उद्योगपतीने तुम्हास लाचलुचपत दाखवली व त्यासाठी तुम्ही तुमची मते विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. या आपल्या वर्गातील माणसाशिवाय भाडोत्री माणसे तुमच्या समाजाचे कवडीचेही कल्याण करु शकणार नाहीत. आपल्यामधील मतभेद दूर करून आपण आपले संघटन वाढवले पाहिजे व परिस्थिती चे ज्ञान करून घेतले पाहिजे."
           बाबासाहेबांनी जे मांडले आहे ते सत्य पोटतिडकीने समाजाच्या उन्नतीसाठी मांडले आहे. बाबासाहेबांना भाकरीच्या भुकेपेक्षा वाचनाची भुक प्रचंड होती. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे.
           "पुन्हा एक नवी दिशा" या पुस्तकात क्रांतीचा ऊगम विचारांच्या राज्यात होतो. हे आल्बर्ट कामू या विचारवंतांच्या मताशी लेखक सहमत वाटतात.
            खरं म्हणजे माझी पात्रता नसतानाही "पुन्हा एक नवी दिशा" या पुस्तकाला प्रस्तावना देत आहे. पुस्तकातील लेखकाच्या विचाराला जरी संपूर्ण न्याय देऊ शकलो नाही हे जरी सत्य असले तरी जे मांडायचा प्रयत्न केला आहे ते सुद्धा "पुन्हा एक नवी दिशा" आहे. आमचे मित्र नितीनराजे अनुसे यांनी सातत्याने लिहीत गेले पाहिजे. त्यांची वैचारिक नजर ही नाजर सारखीच आहे. त्यांना माझ्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!!
        ✍️ प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय
   राणी सावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी
आबासाहेबांना पुन्हा एक नवी दिशा पुस्तकाची प्रत देऊन प्रकाशन करण्यात आले.

पुस्तकाचे नाव - 📖 पुन्हा एक नवी दिशा
लेखकाचे नाव - ✍️  नितीनराजे अनुसे
                      (+918530004123)
इ.मेल - nitinrajeanuse123@gmail.com
पुस्तकाची मुळ किंमत        - ₹ १५०
(१ मे २०१८ ते ३१ मे २०१८ - ₹ १०० फक्त)

पुस्तकासाठी संपर्क :
सागर मासाळ (कोल्हापूर)
+917261968405

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग