अन् आईच्या डोळ्यात पाणी आलं....

"पुन्हा एक नवी दिशा" हे माझे पहिले पुस्तक माझ्या आई-तात्यांना समर्पित

      ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे मी काहीतरी देणं लागतो म्हणून अंधकाराच्या खाईत भरकटलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या समाजाचे  गेल्या तीन-चार वर्षापासून समाजप्रबोधन करतोय. सातत्याने समाजप्रबोधनपर लेखन चालूच आहे शिवाय कार्यक्रम देखिल त्यामुळे व्याख्याने, सत्कार, सन्मान हे साहजिकच होत राहणार. मुंबईला असताना एखादेवेळी कार्यक्रमासाठी गावाकडे आलो तर घरी बसायची कधी उसंत  नसायची सतत गडबड आणि पळापळ... हो मोठेपणा म्हणून सांगत नाही तर वस्तूस्थिती म्हणून सांगतोय. आई-तात्यांना समजायचं नाही की मी नक्की काय करतोय ते... पण कार्यक्रमात केलेल्या सन्मानाचा फेटा अथवा एखादे सन्मानचिन्ह हातात दिसले की त्यांना एवढंच समजायचे की मी  कुठेतरी कार्यक्रमाला जाऊन आलोय. पण घरी आल्यासारखं चहा-नाष्टा करण्यासाठी सुद्धा कधी कधी वेळ नसायचा जेवण तर दूरची गोष्ट त्यामुळे आई-तात्या चिडचिड करायचे. कधी कधी तर तात्या म्हणायचे सुद्धा की आपला धनगर समाज म्हणजी धनगरी जत्रा अन् कारभारी सत्रा अशातला प्रकार हाय.  कितीही सांगितलं समाजासाठी काहीबी केलं तरी ते केलं म्हणनार नाहीत. प्रत्येकाची तोंडं वेगवेगळ्या दिशेलाच असणार...  एवढं करून पण उद्या तुलाच शिव्या घालायला हे कमी करणार नाहीत. असे तात्या म्हणायचे पण त्यावर मी शांतपणे म्हणायचो की तात्या हा समाज आज नाहीतर उद्या सुधरेल पण नक्कीच सुधरेल. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. 
       खरंतर माझ्या आई-तात्यांनी शाळेचे कधी तोंडही पाहिले नाही मग अक्षरांची तोंडओळख तर दूरदूरचीच गोष्ट त्यातूनही मी पहिली दुसरीत असताना माझा अभ्यास घेत घेत तात्या त्यांच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर वाचायला शिकले हे वैशिष्ट्यच...   परवा कोल्हापूरात "पुन्हा एक नवी दिशा" या माझ्या पहिल्याच पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यापूर्वी घरी असताना मी आई-आई तात्यांना पुस्तकाचे कव्हर पेज दाखवले. तात्यांनी मोडक्या तोडक्या शब्दांत त्या पाठीमागच्या कव्हर पेज वरील हायलाइट ओळी वाचल्या आई देखिल कौतुकाने ऐकत होती. "ज्यांना आई-वडिलांच्या चटक्याची जान असते त्यालाच समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं.... " या ओळी आणि आतील पानावर सुरवातीला लिहलेल्या ओळी म्हणजेच "ज्यांनी काबाडकष्ट करून मला शिकवलं आणि घडवलं अशा माझ्या आई-तात्यांना माझे पहिले पुस्तक समर्पित करत आहे. " या ओळी वाचून माझ्या आई-तात्यांचे अंतकरण भरून आले. तेव्हा कोणी भेटेल त्यांना त्या सांगायचे की आमच्या पोरानं पुस्तक लिव्हलंय, आमचा नितीन लेखक हाय. 
      कोल्हापूरात पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर काल सकाळी केरळला निघायची माझी गडबड पुन्हा सुरू झाली. केरळवरून पुस्तक प्रकाशनासाठी सलग दोन तीन दिवसाच्या प्रवासामुळे सौभाग्यवतीची तबियत फार बिघडली होती तरीही पुन्हा माघारचा प्रवास करणे गरजेचे होते. घरी म्हैशीची धार काढणे, त्यांचा चारापाणी, शेळ्या-मेंढ्याची देखभाल यातून आईला फुरसत नव्हती. तबियत खराब असताना देखिल सौभाग्यवतीने शिदोरीचा स्वयंपाक करून घेतला. होता घरातून निघायचा वेळ जसजसा जवळ येत होता तसतसी गडबड अधिकच वाढत होती. जेवण करून घ्या म्हणून आईचा तगादा सुरूच होता कारण प्रवासात कधी जेवायला वेळ भेटतो न भेटतो. जेवायला बसल्यानंतर आम्ही दोघांनीही नको म्हणत असताना देखिल रात्रीची शिळी भाकरी कुस्करली कारण गरम गरम कालवण मध्ये बाजरीची शिळी भाकरी खायची मज्जा वेगळीच असते. जेवण करून आम्ही प्रवासाला निघालो रात्री प्रवासात असताना घरी फोन केला.  नुकतीच मेंढरं घरी आल्यानंतर त्यांना खुराक चारायचं चालू होतं.  तात्यांशी बोलून झाल्यावर आईने फोन घेतला आणि तीने जेवणाबद्दल चौकशी केली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण सकाळच्या घाई गडबडीत ताजी भाकरी करून द्यायला घरच्या कामातून तिला जमले नाही म्हणुन तिला भरून आले. मी तिला समजावत म्हणालो अगं काही नाही होत शिळी भाकरी खाल्ली म्हणून... आणि तसंही मी लहानपणापासून जे मिळेल ते खात आलोय कधी हट्ट नाही ना कधी चव केली त्यामुळे वाइट वाटून घेऊ नको मला चालतं. घरी दोन दिवस होतो तेव्हा "आमचं पोरगं/आमचा नितीन लेखक हाय, पुस्तक लिव्हतू आणि उद्या कोल्हापूरात पुस्तकाचं उद्घाटन हाय". असं कौतुकाने प्रत्येकाला सांगणारी माझी आई स्वता दिवसभर मेंढ्यांमागून दोन घास खायला वेळ भेटला नव्हता तरी पोरानं आणि सुनेनं शिळी भाकरी खाल्ली म्हणून हळहळ व्यक्त करत होती. तेव्हा नकळत माझे मला भरून आले अन् मनाशीच पुटपुटलो... 
फेडीन म्हणतो सारे पांग तुझे
 पण ते कधीच फिटणार नाही....
आई तुझ्याशिवाय कोणीच गं श्रेष्ठ नाही... 
धन्य तु माझी मायमाऊली 
तुझ्याच पोटी मी जन्म घेतला.
      नितीनराजे अनुसे 
(लेखक : पुन्हा एक नवी दिशा) 
संपर्क/व्हाटसप +91 853 000 4123

धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे आणि अधोगतीकडून प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठीच "पुन्हा एक नवी दिशा"

पुस्तकासाठी संपर्क:-
सागर मासाळ (कोल्हापूर)
☎ +917261968405
(पुस्तक पोस्टाने पाठवण्याची देखिल सेवा उपलब्ध) 

Comments

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर